आत्मविश्वास
आत्मविश्वास हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा कणा आहे. आत्मविश्वास म्हणजे स्वतःबद्दलचा
विश्वास. एखादी गोष्ट मी करू शकतो हा विश्वास म्हणजेच आत्मविश्वास. आत्मविश्वास
असणारी व्यक्ती जग जिंकू शकते. जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास ही खूप
महत्वाची गोष्ट आहे. जगातील सर्व महान स्त्री पुरुषांकडे अमर्याद आत्मविश्वास
असल्याचे दिसून येते. जगाने नावे ठेवली तरी त्यांचा आत्मविश्वास कमी होत नाही. आपले विचार व कृती
यावर ते ठाम राहतात. स्वतःचे सामर्थ्य व
क्षमता याची त्यांना पुरेपूर जाणीव असते. आत्मविश्वास म्हणजे स्वतःकडे सकारात्मक
विचाराने पहाणे. असे विचार जग बदलून टाकू शकतात. स्वतःच्या विचारावर, कृतीवर,
क्षमतेवर, ध्येयावर, कर्तृत्वावर असणारा अमर्याद विश्वास म्हणजेच आत्मविश्वास.
आत्मविश्वास म्हणजे आपली क्षमता
आणि आपल्या मर्यादा लक्षात घेऊन रोजची कामे करणे, रोजचा अभ्यास करणे. आत्मविश्वास
म्हणजे एकदम टोकाची भूमिका न घेणे, क्षुल्लक गोष्टीसाठी त्रागा
नकारणे, अकारण स्वतःला दोष न देणे, मिळून
मिसळून वागणे, मन मोकळे ठेवणे.
आत्मविश्वास म्हणजे स्वतःची तुलना स्वतःशीच करणे, इतरांशी आपली तुलना
न करणे, महत्त्वाच्या विषयाला महत्त्व देणे. हाती
घेतलेले प्रत्येक काम मनापासून करणे, पूर्ण
ताकदीने करणे. आत्मविश्वास म्हणजे कोणीही काहीही बोलले
तरी अस्वस्थ न होता, योग्य तो प्रतिसाद देणे. आपल्या प्रत्येक कृतीच्या
वेळी मागचा-पुढचा विचार करणे. आपल्या चुका प्रांजळपणे कबुल करणे. त्यात
सुधारणा करणे. आपल्या अपयशाचे खापर परिस्थितीवर किंवा दुस-या कोणावर फोडण्यापेक्षा
आपल्या अपयशाची खरी कारणे शोधणे. आवश्यक तिथे सुधारणा करणे. आत्मविश्वास
म्हणजे अंदाज बांधणे तसेच अचूक व परिणामकारक निर्णय घेण्याचा प्रयत्न
करणे. माहीत असतानासुद्धा नव्याने माहीत करून घेण्यासाठी तत्पर असणे.
आपले शहाणपण झाकून ठेवणे व योग्यवेळी त्याचा वापर करणे. आत्मविश्वास म्हणजे
घडून गेलेल्या घटनांची खंत न करता येणा-या भविष्यासाठी वर्तमानाचे सोने
करणे. आत्मविश्वास म्हणजे आपण करत असलेल्या कार्याचा उद्देश व परिणाम
याची पूर्ण जाण असते.
एका नामांकित कंपनीत मुलाखती चालू होत्या. एका
मुलाचे सादरीकरण सुरु झाले. जेमतेम काही सेकंद झाले
असतील, त्या मुलाला बोलता येईना, दरदरून
घाम फुटला होता. चक्कर येऊन पडतो कि काय इतपत स्थिती झाली. त्याने
सादरीकरण थांबवले. तो बाहेर गेला. मुलाखत घेणारा एकजण म्हणाला ‘हा चांगला
उमेदवार दिसतोय. आय आय टी पास
आउट आहे. पण घाबरला बिचारा. नुसता
मेरीटवाला असून काय उपयोग ? आत्मविश्वास शून्य !’
आत्मविश्वास असणे आणि नसणे
आत्मविश्वास नसेल तर छोट्या छोट्या गोष्टी खूप अवघड वाटतात. तुम्ही एखादी गोष्ट सुरु केली. उदा. परीक्षेचा अभ्यास सुरु केला,
एखादा नवीन व्यवसाय सुरु केला, घर बांधायला काढले. आणि कोणीतरी म्हटले की तुला ही
गोष्ट जमणार नाही. काय वाटेल? तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही अशा बोलण्याकडे
लक्षही देणार नाही. तुम्ही म्हणाल, कसे जमत नाही तेच बघतो, मला जमणार म्हणजे
जमणार. आणि तुम्ही दुप्पट जोराने व जोमाने कामाला लागल. तुमच्यात आत्मविश्वास नसेल
तर तुम्ही घाबरून जाल. तुम्हाला स्वतःबद्दल शंका वाटायला लागेल. खरोखरच मला जमेल
की नाही, असे वाटेल. स्वतःबद्दल शंका घेणे हे आत्मविश्वास नसल्याचे लक्षण होय.
आत्मविश्वास असणारी व्यक्ती धोके पत्करायला तयार होते. उदा. नवीन व्यवसाय
सुरु करण्यात एक प्रकारचा धोका असतो. व्यवसायाचा अनुभव नसतो, स्पर्धा असते वगैरे.
परन्तू अशा व्यक्तीला याची भीती वाटत नाही. तिला पूर्ण विश्वास असतो की मी यशस्वी
होणार. कितीही अडचणी आल्या तरी ती पुढे पुढे जात रहाते. याचे कारण म्हणजे आत्मविश्वास.
याउलट आत्मविश्वास नसणारी व्यक्ती धोके पत्करत नाही. तिला अपयशाची भीती वाटते. चालले
आहे ते बरे आहे, नवीन काही नको, अशी तिची भावना असते.
आत्मविश्वास असणारी व्यक्ती स्वतःच्या चुका मान्य करते. यात कमीपणा मानत
नाही. अशा चुकामधूनच पुढे शिकता येते हे तिला माहिती असते. नवीन गोष्टी शिकण्याची
तिची तयारी असते. आत्मविश्वास नसणारी व्यक्ती चुका मान्य करीत
नाही. मात्र याबद्दल वाद घालत बसते. नवीन गोष्टी शिकण्याची तिची तयारी नसते. अशा व्यक्ती
अनेकदा उगीचच ऐट करताना दिसतात.
तुम्ही कोण आहात यापेक्षा तुम्ही स्वतःला कोण समजता हे महत्त्वाचे
आहे. तुमच्यामध्ये अमर्याद सामर्थ्य लपलेले आहे. ते म्हणजे तुमचा आत्मविश्वास. एकदा
एक सिंहाचे पिलू वाट चुकले. जवळून एक धनगर आपल्या मेंढ्या घेऊन चालला होता.
योगायोगाने ते मेंढ्याच्या कळपात आले. त्याला स्वतःबद्दल काही माहिती नव्हते. ते
स्वतःला मेंढी समजू लागले. एका मेंढीला आई समजू लागले. ते मेंढराबरोबर खेळायचे,
गवत खायचे. त्याने कधीही गर्जना केली नाही. हळूहळू हे पिलू मोठे झाले. एका सिंहाने
ते पहिले. करुन पिलाला जवळ बोलावले. पिलू प्रथम घाबरले. सिंहाने त्याला सांगितले,
‘अरे तू सिंह आहेस, मेंढरात का राहतोस?’. पिलाला ते अजिबात पटेना. ते घाबरून दूर
पळू लागले. सिंहाने त्याला पकडले व नदीवर नेले. पाण्यात त्याला प्रतिबिंब दाखवले.
पिलाला आता ते सिंह असल्याचे पटले. त्याला आनंद झाला. त्याने मोठ्याने गर्जना
केली. अनेक लोकाचे जीवन हे या सिंहाच्या पिलाप्रमाणे असते. स्वतःचे सामर्थ्य
त्यांना माहिती नसते. त्यामुळे कमी आत्मविश्वास असतो. तुमच्यातील आत्मविश्वास
झोपलेला आहे. त्याला जागृत करा. स्वतःचे सामर्थ्य ओळखा. जगातील कोणतेही ध्येय
तुम्ही पार करू शकता. जीवनात यशस्वी होऊ शकता.
आत्मविश्वास कसा वाढवावा?
आत्मविश्वास म्हणजे काय हे आपण पहिले. तुमच्यामध्ये तो निश्चितच आहे.
अजिबात नाही असे नाही. प्रत्येकाकडे आत्मविश्वास असतो. फक्त काही वेळा, काही
घटनांमधे, परिस्थितीनुसार आत्मविश्वास डळमळीत होतो. आत्मविश्वास कमी असेल तर तो
निश्चितपणे वाढविता येतो. मात्र यासाठी तुमचे प्रयत्न आवश्यक आहेत. आत्मविश्वास वाढविण्यासाठी
पुढील सूचना पाळाव्यात.
· पूर्ण तयारी करा – कोणतेही काम सुरु
करताना कामाची पूर्वतयारी केली पाहिजे. तयारी अर्धवट असेल तर काम नीट न होण्याची शक्यता
वाढते. त्यामुळे आत्मविश्वास कमी होतो. नीट अभ्यास न करता परीक्षेला अथवा
मुलाखतीला जाताना काय वाटेल? आत्मविश्वास वाटेल का? कधीही नाही. लक्षात ठेवा Good preparation, half done.
· छोटी ध्येये ठेवा - छोटी ध्येये सहजपणे पार करता येतात. कोणतेही
ध्येय सफल झाले की आत्मविश्वास वाढतो. वाढलेला पुढच्या ध्येयापर्यंत जाण्यास मदत
करतो. उदा. एकदम ९०% गुणाचे ध्येय न ठेवता अगोदर ८०% गुण मिळविण्याचा प्रयत्न करा.
छोट्या व्यवसायात जम बसवा. मग हळू हळू
वाढवत न्या.
· न्यूनगंडावर मात करा – स्वतःमधील
कमीपणाची जरुरीपेक्षा जास्त जाणीव असणे व त्यामुळे नकारात्मक भावना निर्माण होणे
म्हणजे न्यूनगंड होय. न्यूनगंड कमी करण्यासाठी कमीपणाची जाणीव, भीती मनातून काढून
टाका. तुमच्यातील चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. अपयशाला घाबरू नका.
चांगला विचार करा व चांगल्याचाच विचार करा.
·
पोशाख व्यवस्थित व
नीटनेटका ठेवा – तुमचे कपडे गबाळे असतील तर लोक तुमच्याकडे आदराने
पहात नाहीत. समोरील व्यक्तीवर छाप पाडण्यासाठी पोशाख दिसणे व्यवस्थित असणे आवश्यक
आहे. First impression is last impression हे लक्षात ठेवा. विशेषतः मुलाखतीच्या वेळी हे गोष्ट महत्वाची ठरते.
· ताठपणे व वेगाने चाला – तुमच्या
चालण्यावरून तुमचा आत्मविश्वास इतरांच्या लक्षात येतो. आत्मविश्वास असणारी व्यक्ती
कोणतीही गोष्ट वेगाने करते. कारण तिला जीवनात खूप काही करायचे असते. हळू हळू चालणे
हे कंटाळा व निरुत्साह दाखवते. त्यामुळे आत्मविश्वास डळमळीत होते.
· पुढे व्हा, पहिल्या रांगेत बसा – एखाद्या कार्यक्रमात अनेक जण मागे रहाणे पसंत करतात. त्याच्यावर
इतरांचा दबाव असतो, त्यांना भीती वाटते. याचे कारण त्यांचात आत्मविश्वास कमी असतो.
तुम्ही जीवनात नेहमी पुढे व्हा. इतरांच्या नजरेत या. इतरांशी बोला, चर्चा करा.
काही लोक बोलायला घाबरतात. तुम्ही कधीही घाबरू नका. आपोआपच तुमचा आत्मविश्वास वाढत
जाईल.
· चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्या – नेहमी तुमच्यातील चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. चांगले
गुण मिळाले. आनंद साजरा करा. नवीन गाडी घेतली. नव्या व्यवसायात यश मिळाले. इतरांनी
तुमचे कौतुक केले. आनंदित व्हा. तुमचा आत्मविश्वास आपोआपच वाढत जाईल.
संतुलित (Balanced) आत्मविश्वास
तुमचा हा आत्मविश्वास संतुलित म्हणजेच
योग्य तितका असला पाहिजे. कमी नको व जास्तही नको. आत्मविश्वास कमी असल्यावर,
डळमळीत झाल्यावर काय होते ते आपण पाहिले. आत्मविश्वास जितका जास्त तितके यश मोठे
असे वाटण्याची शक्यता आहे. परंतू तसे नसते. अति आत्मविश्वास (Over confidence) हा यशाला मारक
ठरतो. अति आत्मविश्वास असणारी व्यक्ती मोठे धोके पत्करते. एकदम मोठ्या यशाची अपेक्षा करते. इतरांनी
धोक्याची जाणीव करुन दिली तरी ऐकत नाही. अनेकदा शेवटी अपयश पदरी पडते. अशी व्यक्ती
जरूरीपेक्षा जास्त ऐट करते. मित्र व नातेवाईक यामध्ये टीकेचा विषय होते. अशा
व्यक्तीचे एकंदर जीवनच असंतुलित असते. अति आत्मविश्वासापासून दूर रहाणेच चांगले.
मानसिकता बदला
आत्मविश्वास मानसिकतेवर अवलंबून असतो. या अर्थाने
तो मनाचा गुणधर्म आहे. ज्याचे मन खंबीर
त्याच्याकडे आत्मविश्वास जास्त. एक ससा होता. खूप भित्रा होता. अंगावर पान पडले
तरी घाबरायचा. एकदा तो आपल्या भित्रेपणाला फार वैतागला. त्याने देवाची प्रार्थना
केली व देवाला प्रसन्न करुन घेतले. देवाकडे वर मागितला की मला वाघ कर. देवाने
त्याला वाघ केले. वाघासारखे मोठे शरीर, तीक्ष्ण नखे त्याला मिळाली. इतर प्राणी
त्याला घाबरू लागले. पण त्याची भीती काही जाईना. जरा काही झाले की काळीज थरथर
कापे. त्याने परत देवाची प्रार्थना केली. देव आता म्हणाला, ‘बाळ सशा, जोपर्यंत
तुझे मन व काळीज भित्रे आहे तोपर्यंत तू भित्राच राहणार. तू मन खंबीर कर, मानसिकता
बदल, तरच तू शूर होणार.’ आत्मविश्वासाचे
पण असेच आहे. मन खंबीर नसेल, आत्मविश्वास हा साध्या संकटानेही डळमळू शकतो. बाहेरील
उपाय त्याला मदत करू शकत नाहीत. त्यासाठी स्थिर व खंबीर अंतरंगच हवे.
आत्मविश्वास म्हणजेच स्वतःवरील विश्वास हा
स्वतःमधील देवत्वाला पुढे आणीत असतो. त्यानंतर जगातील कुठलेच काम अवघड रहात नाही. तुमच्यातील
आत्मविश्वास जागृत करा. तो तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल.