डिजिटल फोटोग्राफी : काळाची गरज
छायाचित्रांची सर्वानाच आवड असते. ट्रीपला जाताना
आपण कॅमेरा विसरत नाही. प्रत्येक घरात एक तरी अल्बम असतो. त्यात अगदी
पूर्वीपासूनचे फोटो जपून ठेवलेले असतात. स्थिर छायाचित्रण म्हणजेच ‘स्टिल
फोटोग्राफी’ ही जगभरात एक कला म्हणून ओळखली जाते. हा एक आगळावेगळा छंददेखील आहे. फोटोग्राफी
हा अनेकांचा व्यवसायही आहे. लग्नासारख्या काही विशेष प्रसंगी आपण व्यावसायिक
फोटोग्राफरला बोलावतो.
फोटोग्राफीसाठी लागणारी साधने व तंत्रज्ञान यात
प्रथमपासूनच अनेक बदल होत् आलेले दिसतात. सुरवातीचे कृष्णधवल युगातील कॅमेरे आता
पाहायलादेखील मिळत नाहीत. गेली अनेक वर्षे रंगीत फिल्म फोटोग्राफीचे युग होते. पण
आता फिल्म फोटोग्राफीचे युग संपल्यात जमा आहे. गेल्या काही वर्षात या क्षेत्रात
क्रांती होऊन डिजिटल फोटोग्राफीचे युग सुरु झाले आहे. केवळ फोटोग्राफीच नव्हे तर
इतर अनेक क्षेत्रातही डिजिटल टेक्नोलॉजी हा परवलीचा शब्द झाला आहे.
डिजिटल फोटोग्राफी अनेक दृष्टीने फायदेशीर आहे.
भविष्यात ती वाढतच जाणार. फिल्म कॅमेरे तसेच फिल्म यापुढे मिळणारच नाहीत. फोटोग्राफी
करण्यासाठी डिजिटल फोटोग्राफी येणे आवश्यक ठरेल. त्यामुळे फोटोग्राफीत रस असणाऱ्या सर्वानीच या
फोटोग्राफीचे वेगळेपण व सारखेपण समजून घेणे गरजेचे आहे. डिजिटल सेन्सर,
मेगापिक्सेल, ऑपटिकल व डिजिटल झूम, कॅमेरा मेन्यू यासारखे शब्द आपल्याला गोंधळात
टाकतात. या गोष्टी वाटतात तितक्या अवघड नाहीत. या संकल्पना एकदा समजल्या की आपण
आत्मविश्वासाने डिजिटल कॅमेरा वापरू शकतो.
डिजिटल फोटोग्राफीसाठी पूर्वीच्या कॅमेऱ्यापेक्षा
वेगळा असा डिजिटल कॅमेरा वापरला जातो. या कॅमेऱ्यात फिल्म घालावी लागत नाही.(आणि
घालता येतही नाही!). यामध्ये फिल्मच्या जागी डिजिटल सेन्सर (सीसीडी किंवा सिमास)
असतो. या सेन्सरद्वारे डिजिटल प्रतिमा तयार होते. या प्रतिमा म्हणजेच
फोटो कॅमेऱ्यातील मेमरी कार्डमध्ये साठवून ठेवले जातात. हे फोटो हवे तेव्हा
कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर तसेच टीवी वर, कॉम्पुटरवर पाहता येतात. नको असणारे फोटो
डिलीट करता येतात. फिल्मचा व फोटो डेव्हलप करण्याचा खर्च नसल्याने हवे तेवढे फोटो
काढता येतात!
मेमरी कार्डमध्ये असणारे फोटो कॉम्पुटरवर डाऊनलोड
केले की कार्ड रिकामे होते व पुन्हा वापरता येते. कॉम्पुटरवर फोटोत हवे तसे बदल
करण्यासाठी हल्ली अगदी सोपी सोफ्टवेअर उपलब्ध आहेत. याद्वारे अनेक गमती करता
येतात. फोटो इंटरनेटवर पाठवता येतात. प्रत्येक कॅमेऱ्याला झूम लेन्स असते. झूम
लेन्स वापरून दूरच्या गोष्टीचे फोटो काढता येतात. मोठी झूम लेन्स (सुपर झूम)
असणारा कॅमेरा घेतल्यास पक्षी-प्राणी यांचे सुंदर फोटो काढता येतात.
जगातील सर्वच कॅमेरा कंपन्यानी डिजिटल कॅमेऱ्याची
अनेक मॉडेल्स बाजारात आणली आहेत. कॅनन, निकॉन, फ्युजी, सोनी, पें क्स या कंपन्या अग्रगण्य आहेत. अगदी चार पाच हजार रुपयांपासून ही मॉडेल्स
उपलब्ध आहेत. प्रत्येक कॅमेऱ्याला आटो मोड असतो. त्यामुळे फोटोग्राफीचे फारसे
ज्ञान नसले तरी बऱ्यापैकी चांगले फोटो काढता,येतात. मन्युअल, अपर्चर-शटर
प्रायोरीटी मोड असणारे कॅमेरे दहा-बारा हजार रुपयांपासून आहेत. यांना क्रिएटिव्ह
मोड असेही म्हटले जाते. फोटोग्राफीचा छंद जोपासनेसाठी हे योग्य ठरतात. सुपर झूम लेन्स
असणारे कॅमेरे थोडे महाग आहेत. सध्या मेगापिक्सेलपेक्षा लेन्स मुळे कॅमेऱ्याची
किमत वाढते असे दिसते. डिजिटल एस.एल.आर कॅमेरे तीस हजारपासून उपलब्ध आहेत. याची
इमेज क़्वलिटी खूपच चांगली असते. तसेच याला वेगवेगळी लेन्सेस बसविता येतात. फोटोग्राफीचा
व्यवसाय करणेसाठी हे कॅमेरे योग्य ठरतात.
मोबाईलमधील कॅमेरा वापरून अनेकजण फोटो काढतात. मोबाईल
आपण नेहमी जवळ बाळगत असल्याने ही सोयीची गोष्ट वाटते. परंतू मोबाईल कॅमेऱ्याला
खूपच मर्यादा असतात. फोटोग्राफीत विशेष रस असणाऱ्यानी डिजिटल कॅमेरा वापरणे
अत्त्यावश्यक आहे.
महागडा कॅमेरा घेतला म्हणजे चांगले फोटो येणारच
असे काही जणांना वाटते. परंतु तसे होत नाही. अनेकाना सर्व बटनांचा अर्थ व उपयोग
माहिती नसतो. यासाठी कॅमेऱ्याबरोबर मिळणारे पुस्तक (मन्युअल) नीट वाचावे.
कॅमेऱ्यातील सर्व तंत्रे समजून घेणे आवश्यक आहे. तसेच या कलेचे ज्ञान असणे आवश्यक
आहे. फोटोग्राफीत प्रकाशयोजना खूप महत्वाची असते. यातील मूलभूत गोष्टी समजून
घेतल्या पाहिजेत. कॅमेऱ्यापेक्षा त्यामागील डोळा महत्वाचा असतो. या विषयावर अनेक
पुस्तके उपलब्ध आहेत. इंटरनेटवर विविध साईट आहेत. याचा अभ्यास केल्यावर आपल्या
फोटोग्राफीत खूप सुधारणा होऊ शकते.
डिजिटल फोटोग्राफी : स्वस्त झालेला महागडा छंद
डिजिटल फोटोग्राफी ही गोष्ट आता फारशी नवीन
राहिलेली नाही. गेल्या काही वर्षात फिल्म फोटोग्राफी मागे पडून डिजिटल फोटोग्राफीचे
युग सुरु झाले आहे. सामान्य माणसांमध्ये याबद्दल कुतूहल आहे. परंतू अनेकांना
याबाबत फारशी माहिती नाही. केवळ फोटोग्राफीच नव्हे तर इतर अनेक क्षेत्रातही डिजिटल
टेक्नोलॉजी हा परवलीचा शब्द झाला आहे.
डिजिटल फोटोग्राफी व फिल्म फोटोग्राफी याचा विचार
केला असता डिजिटल फोटोग्राफी अनेक दृष्टीने फायदेशीर आहे असे दिसून येते. फिल्म फोटोग्राफीमध्ये
फिल्म रोल वापरला जातो. हा रोल डेव्हलप करुन प्रिंट काढल्यानंतरच आपल्याला फोटो
पाहायला मिळतात. हा खर्च एका रोलला सुमारे तीनशे रुपये येतो. हा खर्च व कॅमेऱ्याची
किमत खूपच असल्याने फोटोग्राफी हा छंद खर्चिक समजला जात होता.
परंतू आता परिस्थिती बदलली आहे. कॅमेऱ्याच्या किमती
कमी होत आहेत. विशेष म्हणजे डिजिटल फोटोग्राफीमध्ये फोटो काढण्याचा प्रत्यक्ष खर्च
शून्य आहे! कसे ते पहा. डिजिटल फोटोग्राफीसाठी पूर्वीच्या कॅमेऱ्यापेक्षा वेगळा
असा डिजिटल कॅमेरा वापरला जातो. या कॅमेऱ्यात फिल्म घालावी लागत नाही.(आणि घालता
येतही नाही!). यामध्ये फिल्मच्या जागी डिजिटल सेन्सर (सीसीडी किंवा सिमास) असतो.
या सेन्सरद्वारे डिजिटल प्रतिमा तयार
होते. या प्रतिमा म्हणजेच फोटो कॅमेऱ्यातील मेमरी कार्डमध्ये साठवून ठेवले जातात. मेमरी
कार्ड भरल्यावर ते फोटो कॉम्पुटरवर डाऊनलोड केले की कार्ड रिकामे होते. ते पुन्हा
वापरता येते. त्यामुळे डिजिटल फोटोग्राफीमध्ये फोटो काढण्याचा खर्च शून्य आहे! आता
फोटोग्राफी हा छंद खर्चिक समजण्याचे कारण नाही. आपण हवे तेवढे फोटो काढू शकतो.
कोणत्याही साध्या विषयावर कॅमेरा रोखू शकतो. अमर्यादित फोटोग्राफी ही मोठी आनंदाची
गोष्ट होय!
फिल्म फोटोग्राफीमध्ये रोल डेव्हलप करुन प्रिंट
काढल्याशिवाय आपल्याला फोटो पाहाताच येत नाहीत. डिजिटल कॅमेऱ्यात मात्र फोटो
काढल्या काढल्या लगेच कॅमेऱ्यातील
स्क्रीनवर पाहता येतो. फोटो चांगला आला नसेल तर तो डिलीट करुन दुसरा काढता येतो. हे
फोटो टीवी वर, कॉम्पुटरवर पहिले तर फोटोच्या एन्लार्जमेंट पाहता येतात.
फोटोग्राफी शिकणे व हा छंद जोपासणे यासाठी डिजिटल
कॅमेरा खूपच उपयुक्त आहे. याद्वारे भरपूर फोटो काढता येतात, काढलेले फोटो लगेच
पाहता येतात. त्यातील चुका लक्षात येऊ शकतात. फोटो चुकला तर परत काढता येतो.
डिजिटल कॅमेऱ्यात नवनवीन तंत्रे वापरून अनेक सोयी केलेल्या असतात. उदा. फोटो हलू
नये म्हणून इमेज स्टबिलायझेशन हे तंत्र वापरले जाते. चांगला फोटो निवडण्यासाठी
बेस्ट शॉट सेलेक्टर हे तंत्र असते. ऑटो मोड हा प्रत्येक कॅमेऱ्यात असतो. त्यामुळे
नवशिक्या व्यक्तीने जरी फोटो काढले तरी ते बऱ्यापैकी चांगले येऊ शकतात.
फिल्म फोटोग्राफीत निगेटीव्ह व प्रिंट सांभळून
ठेवणे, पुन्हा प्रिंट काढण्यासाठी निगेटीव्ह शोधणे या गोष्टी त्रासदायक वाटतात.
निगेटीव्ह व प्रिंट खराब होण्याचीही शक्यता असते. डिजिटल फोटो वर्गीकरण करुन
कॉम्पुटरमध्ये, वेगवेगळ्या फोल्डरमध्ये ठेवता येतात. तसेच ते सीडीवर किंवा
पोर्टेबल हार्ड डिस्कवर ठेवणे चांगले. म्हणजे कॉम्पुटर बिघडला तरी काळजी नाही.
सध्या सोशल नेटवर्किंग साईटवर फोटोंना खूपच
महत्त्व आले आहे. हे फोटो अर्थातच डिजिटल फोटो असतात. नेटवर अपलोड करताना त्या
फोटोचा आकार म्हणजेच फाइल साइझ लहान करून घ्यावा. म्हणजे ते पटकन अपलोड होतात. तसेच फोटोची मोठी
प्रिंट काढून दुरुपयोग होण्याची शक्यता कमी होते. फाइल साइझ लहान करण्यासाठी इझी
थम्बनेल हे छोटे सोफ्टवेअर छान आहे.
हल्ली जास्त मेगापिक्सेल कॅमेरा असणारे मोबाईल
बाजारात आले आहेत. ते वापरून वापरून
अनेकजण फोटो काढतात. मोबाईल आपण नेहमी जवळ बाळगत असल्याने ही सोयीची गोष्ट वाटते.
परंतू मोबाईल कॅमेऱ्याला खूपच मर्यादा असतात. त्यात डिजिटल कॅमेऱ्यात असणाऱ्या
सोयी नसतात. फोटोग्राफीत छंद म्हणून विशेष रस असणाऱ्यानी डिजिटल कॅमेरा वापरणे
अत्त्यावश्यक आहे.
कॉम्पुटर व विविध सोफ्टवेअर वापरून फोटोत हवे तसे
बदल करता येतात. फोटोतील चुका बेमालूमपणे
दुरुस्त करता येतात. हे काम शांतपणे, सवडीने, वेळ काढून करता येते. डिजिटल फोटोग्राफीचा
हा मोठा फायदा आहे. यासाठी हल्ली अगदी सोपी सोफ्टवेअर उपलब्ध आहेत.
एकंदरीत पाहता डिजिटल फोटोग्राफीने फोटोग्राफी
स्वस्त, सुंदर व आनंददायक केली आहे. फोटोग्राफी हा छंद आता पूर्वीइतका खर्चिक
राहिला नाही. फोटोग्राफीत रस असणाऱ्या प्रत्येकाने डिजिटल कॅमेरा घेऊन फोटो
क्लीकिंग सुरु करावे!
डिजिटल फोटोग्राफीतील गमती जमती
फोटोग्राफीची आवड असणाऱ्या प्रत्येकानेच आतापर्यंत
डिजिटल कॅमेरा हातात घेतला असणार यात शंका नाही. डिजिटल फोटोग्राफीने फोटोग्राफी
फारच सुंदर व आनंददायक केली आहे. डिजिटल कॅमेऱ्यात असणाऱ्या सोयी (features) म्हणजे अलीबाबाची
गुहाच म्हणावे लागेल. या सोयीमुळे कॅमेरा क्लीकिंग ही गोष्ट खूपच मजेदार झाली आहे.
डिजिटल कॅमेऱ्यात फोटो काढल्यावर लगेच
कॅमेऱ्यातील स्क्रीनवर पाहता येतो. फोटो चांगला आला नाही, आवडला नाही तर तो डिलीट
करुन दुसरा काढता येतो. प्लेबॅक झूम (playback
zoom) वापरून मोठा करुन पाहता येतो. कमी प्रकाशात फोटो
हलला तर ही गोष्ट उपयोगी पडते. माणसांच्या फोटोत काही वेळा तोंड उघडे राहते, डोळे
मिटतात. अशा वेळी फोटो पुन्हा काढता येतो.
‘मक्रो फोटोग्राफी’ (macro) साठी (अत्यंत जवळून
फोटो काढणे) डिजिटल कॅमेरा उपयोगी आहे. यात फक्त दोन सेमी अंतरावरून फोटो काढता
येतो. काही कॅमेऱ्यात तर शून्य अंतरावरून फोटो काढता येतो. म्हणजे कॅमेरा वस्तूला
टेकवला तरी तो फोकस करतो व फोटो काढता येतो. अगदी छोट्या फुलाचा फोटो काढून तो
कॉम्पुटरवर पहिला तर तो पंधरा वीस पट मोठा पाहता येतो. छोट्या किटकाचे असे फोटो
काढता येतात. सूक्ष्म गोष्टींचे जग खूप सुन्दर आहे. याचा पुरेपूर आनंद मक्रो
फोटोग्राफीत मिळतो. कॅमेऱ्यात यासाठी फुलाचे चित्र असणारे बटन असते.
वेगवगळ्या विषयांचे फोटो काढण्यासाठी डिजिटल
कॅमेऱ्यात ‘सीन मोड’ (scene mode) असतात. उदा. निसर्गचित्र, व्यक्तिचित्र, खेळाचे फोटो, सूर्यास्त,
आतषबाजी, रात्रीचे फोटो इ. अशा विविध विषयांचे चांगले फोटो येण्यासाठी अपर्चर-शटर वगैरे
गोष्टीची माहिती हवी. या गोष्टी माहिती
नसल्यास खुशाल ‘सीन मोड’ वापरावेत. या मोडमध्ये कॅमेरा योग्य ती सेटिंग लावून
घेतो. त्यामुळे या विषयावरचे फोटो काढणे सोपे जाते. नवशिक्या फोटोग्राफरसाठी ही
गोष्ट महत्वाची ठरते. तथापि ही सेटिंग समजून घेऊन कॅमेरा वापरणे कधीही चांगलेच
होय.
फिल्म कॅमेऱ्यात ब्लक अन्ड व्हाईट म्हणजेच कृष्ण
धवल फोटो काढण्यासाठी ती फिल्म घालावी लागते. डिजिटल कॅमेऱ्यात फक्त सेटिंग बदलून
ब्लक अन्ड व्हाईट फोटो काढता येतात. विशेष
म्हणजे असे सेटिंग बदलल्यावर कॅमेरा स्क्रीन हा कृष्ण धवल होतो. त्यामुळे फोटो कम्पोझ
करणे सोपे जाते. जुन्या फोटोंचा भास निर्माण करणारे सेपिया रंगाचे फोटोदेखील काढता
येतात. तसेच रंगाचे इतर वेगवेगळे इफेक्ट्सही आणता येतात. हे रंगांचे खेळ म्हणजे
तंत्रज्ञानाची कमाल होय!
लांब आडवा फोटो म्हणजे पनोरमा (panorama) होय. असे फोटो
विशेषतः निसर्गचित्र या विषयाचे काढले जातात. यासाठी डिजिटल कॅमेऱ्यात ‘स्टिच
असिस्ट’ मोड असतो. याद्वारे अनेक फोटो काढून ते कॉम्पुटरवर जोडता येतात. काही
कॅमेऱ्यात तर अशी सोय असते की कॅमेरा फक्त आडवा फिरवायचा. तो जरूर ते फोटो काढून,
ते जोडून पनोरमा तयार करतो!
‘बेस्ट शॉट सेलेक्टर’ या मोडमध्ये कॅमेरा आपोआप
अनेक फोटो काढतो. त्यातील सर्वात शार्प फोटो सेव्ह केला जातो. टेलिफोटो लेन्स
वापरताना फोटो हलू शकतो. वाऱ्याने फूल हलत असेल तर फोटो शार्प येत नाही. अशावेळी
हा मोड उपयोगी ठरतो. टेलिफोटो लेन्ससाठी ‘इमेज स्टबिलायझेशन’ हे विशेष तंत्र मोठी
झूम लेन्स (सुपर झूम) असणाऱ्या कॅमेऱ्यात वापरले जाते. अशा विविध तंत्राने आपले
फोटो जास्तीत जास्त चांगले येण्याची किमया डिजिटल फोटोग्राफीमध्ये शक्य आहे!
फिल्मची प्रकाश संवेदनशीलता (light sensitivity) ASA मध्ये मोजली जाते. जास्त ASA मुळे कमी प्रकाशात फोटो निघतो. फिल्म कॅमेऱ्यात समजा २०० ASA ची फिल्म घातली तर
सर्व फोटो २०० ने काढावे लागतात. डिजिटल कॅमेऱ्यात एका फोटोसाठीदेखील ASA बदलून घेता येते.
अगदी कमी प्रकाशात फोटो काढण्यासाठी ASA १६००, ३२००, ६४०० किंवा जास्त ठेवण्याची सोय असते. मात्र जास्त ASA मुळे फोटोची गुणवत्ता
कमी होते. त्यात ठिपके (grains) येतात ही गोष्ट लक्षात ठेवावी.
अक्शन व स्पोर्टस फोटो काढताना नेमका क्षण टिपणे
अवघड असते. यासाठी कॅमेऱ्यात बर्स्ट (Burst) मोड असतो. बर्स्ट मोडमध्ये कॅमेरा अनेक फोटो क्षणार्धात काढतो. एका
सेकंदात ८ ते १० फोटो निघतात. याचा उपयोग करुन हवा तो क्षण, ती पोज मिळवता येते.
या सर्व गोष्टी पहाता कॅमेरा क्लीकिंग ही गोष्ट
खूपच मजेची झाली आहे. रोज नवे नवे तंत्रज्ञान या क्षेत्रात येत आहे. त्यामुळे
डिजिटल कॅमेऱ्यात असणाऱ्या सोयी व गमती जमती वाढतच निघाल्या आहेत. फोटोग्राफीत रस असणाऱ्या
प्रत्येकानेच या अलीबाबाच्या गुहेत प्रवेश
करावा!
फोटोग्राफीतील करियरच्या संधी
‘स्टिल फोटोग्राफी’ म्हणजेच स्थिर छायाचित्रण ही
जगभरात एक कला म्हणून ओळखली जाते. हा एक आगळावेगळा छंददेखील आहे. तसेच फोटोग्राफी
हा एक व्यवसायही आहे. याकडे करियर म्हणून
पहाणे सहज शक्य आहे. यासाठी अनेक फोटोग्राफी स्कूलमध्ये विविध कोर्सेस उपलब्ध
आहेत. इंटरनेटवर ऑनलाईन कोर्सेस आहेत. मोफत ऑनलाईन कोर्सेसदेखील आहेत. व्यावसायिक
फोटोग्राफर बनणे आजच्या जगात अवघड नाही. व्यावसायिक फोटोग्राफर होण्याच्या अनेक
वाटा, अनेक प्रकार आहेत. यासाठी आपली आवड, गुंतवणूकीची तयारी, कष्टाची तयारी
इत्यादीचा विचार केला पाहिजे.
यातील सर्वात साधा, सोपा प्रकार म्हणजे लग्न,
मुंज, सत्कार यासारख्या काही विशेष समारंभाचे, प्रसंगाचे फोटो काढणे. याला सोपा
म्हणण्याचे कारण म्हणजे यासाठी स्टुडिओ असण्याची गरज नाही. फक्त कॅमेरा, फ्लश व
इतर काही गोष्टी असल्या की काम सुरु करता येते. कॅमेरा मोडस, लायटिंग, कॉम्पोझिशन
इत्यादीच्या जुजबी ज्ञानावर अनेकजण फोटोग्राफी सुरु करतात. परंतू या गोष्टींचे
सखोल ज्ञान असणे कधीही चांगलेच होय. या प्रकारच्या व्यवसायात फोटोच्या
गुणवत्तेसाठी एस एल आर कॅमेरा वापरावा. यातील गुंतवणूक सुमारे पन्नास हजार रु
पर्यन्त जाते.
स्वतःचा स्टुडिओ असणे, त्यात विविध फोटोग्राफी
प्रकारची करणे ही पुढची पायरी आहे. स्टुडिओ उघडताना आपण कोणत्या प्रकारची
फोटोग्राफी करणार याचा विचार केला पाहिजे. त्याप्रमाणे कॅमेरा, लायटिंगची
इक़्विपमेंट, बकग्राउन्ड, पडदे, सेट्स अशा अनेक गोष्टींची व्यवस्था असली पाहिजे.
अनेकजण स्टुडिओ उघडतात व आयुष्यभर आयकार्डचे फोटो काढत बसतात. यापुढे जाऊन ग्लमर फोटोग्राफी,
फशन फोटोग्राफी, प्रोडक्ट फोटोग्राफी यामध्ये
प्राविण्य मिळवले तर चांगले करियर घडविता येते.
वरील प्रकारच्या फोटोग्राफीला सध्या खूपच मागणी
आहे. सध्या जाहिरातीचे युग आहे. प्रत्येक जाहिरातीत फोटो असतोच. अनेकवेळा फोटोच्या
गुणवत्तेवर जाहिरातीचे यश अवलंबून असते. त्यामुळे चांगल्या फोटोग्राफरला या
क्षेत्रात नेहमीच मागणी राहणार. मात्र यासाठी मोठा स्टुडिओ व आवश्यक त्या सर्व
सोयी जरुरी आहेत. काही लाखात गुंतवणूक करणे गरजेचे आहे. उत्पन्नही चांगले मिळते.
लहान मुलांचे, तरुण-तरुणींचे फोटो सेशन करुन
घेण्याचा ट्रेंड अलीकडे वाढत आहे. घरी जाऊन, बागेत, काही खास लोकेशनवर अशी सेशन
केली जातात. यासाठी पोर्ट्रेट फोटोग्राफीचा अभ्यास करुन त्यात मास्टरी मिळवता
येईल. ज्यांना लोकांमध्ये मिसळायला, बोलायला आवडते अशा फोटोग्राफरसाठी हे छान
करियर होऊ शकते.
इंडस्ट्रीयल फोटोग्राफी, इंटेरिअर/आर्किटेक्चरल फोटोग्राफी हादेखील उत्तम करियरचा मार्ग आहे.
अनेक कंपन्याची ब्रौचर, कॅटलॉग इत्यादीसाठी फोटो आवश्यक असतात. वेबसाईट तयार
करताना फोटो आवश्यक असतात. ग्रीटिंग साठी फोटो लागतात. यावर लक्ष केंद्रित करता
येईल.
सध्या डिजिटल फोटोग्राफीचे युग आहे. यामध्ये
कॉम्पुटरचा वापर असून फोटोग्राफीतील अनेक सोफ्टवेअर वापरली जातात. ही सोफ्टवेअर
शिकून स्वतः कामे करता येतात. तसेच
स्टुडिओमध्ये, फोटो लबमध्ये नोकरी मिळू शकते. फोटो मिक्सिंग करणे, रीटचिंग करणे, ब्लक अन्ड
व्हाईटचा रंगीत करणे अशी कामे कॉम्पुटरवर केली जातात. डिजिटल फोटोचे विविध प्रकारचे अल्बम तयार करता येतात. हादेखील
करियरचा एक मार्ग आहे.
कोणत्याही प्रकारच्या फोटोग्राफीत करियर
करण्यासाठी त्याचे तांत्रिक व कलात्मक ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. मूलभूत ज्ञान, कॅमेरा
मोडस, लायटिंग, कॉम्पोझिशन या गोष्टी शिकल्या पाहिजेत. याचा अनुभव घेतला पाहिजे.
सुरवातीला एखाद्या प्रथितयश फोटोग्राफरच्या हाताखाली काम केले पाहिजे. फोटोग्राफी
ही एक कला आहे हे लक्षात ठेवावे. ज्याला ही कलात्मकता समजली तोच यात करियर करू
शकेल.
फोटोग्राफी कोर्सेस, डिप्लोमा करण्यासाठी काही
संस्थाची नावे देत आहे. भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र, बसंत-बहार रोड,
(कोल्हापूर), लाईट स्टाईल इन्स्टिट्यूट ऑफ फोटोग्राफी, एम आय टी स्कूल ऑफ
फोटोग्राफी, शेल्स फोटोग्राफी (सर्व पुणे), शरी अकादमी, उधान स्कूल ऑफ फोटोग्राफी,
विनेय फोटोग्राफी स्कूल, नशनल इन्स्टिट्यूट ऑफ फोटोग्राफी (सर्व मुंबई), दृष्टी
स्कूल ऑफ फोटोग्राफी, स्टुडिओ कृती, स्कूल
ऑफ आर्ट अन्ड फोटोग्राफी, डार्तर
फोटोग्राफी (सर्व बेंगलोर). या संस्थाची अधिक माहिती इंटरनेटवर पहावी.
मोफत ऑनलाईन कोर्सेस
असणाऱ्या वेबसाइट पुढीलप्रमाणे- www.photographycourse.net www.bestphotolessons.com
www.petapixel.com, www.karltaylorphotography.com
www.1milliondollarphoto.com, www.schoolofphotography.com
www.cameras.about.com